पॉकेटमनी
पॉकेटमनी
आपल्या लहानपणी पॉकेटमनी हा शब्द फारसा ऐकिवात नव्हता. शाळा
कॉलेजमध्ये मधल्या सुट्टीत लागणारा खाऊ आईने घरी केलेला असायचा आणि तो खाण्यातही
खूपच आनंद होत असे. शाळेत येणे जाणे ही फारसे खर्चिक नव्हते.
आता मात्र काळ बदलला आहे आणि मुलांना पॉकेटमनी देणं गरजेचं झालं आहे. बऱ्याचदा मुलांच्या शाळा–कॉलेज दूर अंतरावर असतात
स्पर्धेपायी असो, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असो किंवा
एखाद्या विषयातलं मुलाचं ज्ञान वाढवण्यासाठी असो. शाळे व्यतिरिक्त क्लासेस, चित्रकला, संगीत या सारख्या कलेची
आवड असेल तर त्याचे वर्ग असे मिळून आजच्या मुलांची दिनचर्या अत्यंत व्यस्त झाली
आहे. काही वेळा मुले घरापासून दूर हॉस्टेल मध्ये राहून शिकत असतात. घरी असली तरीही
हल्ली मुलांचे दोन्ही पालक नोकरी निमित्ताने घराबाहेर असतात. अशा परिस्थितीत
मुलांना पॉकेटमनी द्यावा की नाही हा प्रश्न गौण ठरतो. पॉकेटमनी
द्यावाच लागतो. पण नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे पॉकेटमनी देताना पालकांनी काळजी
घेणे नक्कीच गरजेचे आहे.
कोणत्या वयापासून मुलांना पॉकेटमनी देण्यास सुरवात करावी या
विषयी काही विशिष्ट नियम नाहीत पण पालकांनी सुरवात करण्यापूर्वी पैशाचे महत्व
समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जीवनाचे जे चार मुख्य आधारस्तंभ आहेत –
धर्म, अर्थ, काम, मोक्ष; त्यातही ‘अर्था’चे महत्व इतर तीन खांबांइतकेच महत्वाचे आहे. या संदर्भात
खालील गोष्टी महत्वाच्या ठरतात.
१)
मुलांना पैशांचे महत्व व त्याचे आपल्या
आयुष्यातील स्थान नीट समजावून द्यायला हवे.
२)
त्याच बरोबरीने नीतीमूल्यांचे शिक्षण देणेही
गरजेचे आहे. त्यामुळे एकंदरीतच जबाबदारीने जगण्याची समज मुलात निर्माण होईल.
३)
पैशांचा वापर कशासाठी करता येईल आणि कशासाठी
करू नये याविषयी त्यांना सजग करायला हवे.
४)
आपल्याजवळ असलेल्या पैशांचा हिशोब योग्यप्रकारे
ठेवण्याची, खर्चाच्या वहीत
लिहिण्याची सवय त्यांना लहानपणापासूनच
लावायला हवी.
५)
मुले साधारणत: बऱ्याच बाबतीत आपल्या पालकांचे अनुकरण करत असतात. हे
लक्षात घेऊन पालकांनी सुद्धा चांगल्या सवयी अंगी बाणत, अवाजवी खर्च टाळत मुलांसमोर आदर्श ठेवायला हवा.
६)
आई वडीलांकडे येणारा पैसा त्यांच्या महेनतीतून
येतो, कष्टातून येतो हेही
त्यांना समजवायला हवे.
७)
सगळ्यांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते
त्यामुळे आपल्या कौटुंबिक परिस्थितीविषयी पण त्याला यथायोग्य माहिती द्यावी.
पालकांनीही इतर पालकांशी बरोबरी न करता आपल्या आर्थिक अवाक्यानुसार पॉकेटमनी
द्यावा.
८)
मुलांना पॉकेटमनी देऊन त्यांच्यावर लक्ष
ठेवण्यापेक्षा मुलांना जबाबदारीने जगण्याचे शिक्षण दिल्यास पैशांविषयी पण एक
सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो.
९)
एखाद्या वेळी मुलाकडून चूक झाली तर एकदम
त्याच्यावर ओरडण्यापेक्षा किंवा रागावण्यापेक्षा त्याला त्याचे सगळे पैलू समजावून
सांगावेत.
१०)
हट्टापायी जर एखाद्या पैसे खर्च केले तर त्या
बदल्यात त्याने चांगले काय गमावले याची पण त्याला जाणीव करून द्यायला हवी. ज्याला
आपण opportunity cost म्हणूया.
११)
पॉकेटमनी पुर्णत: खर्च न करता त्यातून ही थोडी
थोडी बचत करण्यास प्रोत्साहन द्यावे.
१२)
अधून मधून पालकांनी आपल्याबरोबर मुलांना
खरेदीसाठी घेऊन जावे व काही निर्णय त्यांना घेऊ द्यावेत ज्यायोगे मुले पैशाच्या
बाबतीत कसा विचार करतात, कोणत्या गोष्टींना
प्राधान्य देतात ते समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करावे.
थोडक्यात काय तर पॉकेटमनी देण्याआधी पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी मुलांशी सहज संवाद साधावा. पॉकेटमनीकडे फक्त गरज भागवण्याचं तात्पुरतं साधन म्हणून न पाहता तो मुलांच्या भविष्याला ही चांगलं वळण लावणारा पडाव आहे हे लक्षात घ्यायला हवे. पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो म्हणजेच आपण त्यात देवत्व पाहतो. तेव्हा त्या देवत्वाचा पालकांनीही आदर करावा आणि मुलांच्या मनात देखील ही जाणीव रुजवावी. त्या परमतत्वाचे आभार मानायला मुलांना शिकवावे जेणेकरून विनम्रतेचा गुणही विकसीत होईल. पैसा ही एक उर्जा असून तिचा अयोग्य व अनाठायी वापर अपायकारक ठरू शकतो याविषयी मुलांना सजग करायला हवे.
मुलांना पॉकेटमनी देताना अशाप्रकारे काळजी
घेतली नाही तर पैशांची नासाडी होतेच पण मुलांच्या आयुष्याला नकारात्मक वळण लागून
संपुर्ण कुटुंबासाठीच त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
- शब्दगंधा
खूप छान लेख
ReplyDelete