मी पृथ्वी बोलते ........

मी पृथ्वी बोलते ........ 

का रे, का सर्वांनी अशी वेळ आणलीत माझ्यावर आज?
ते विज्ञान वगैरे बाजूला राहू द्या. जेव्हापासून जीवसृष्टीनं जन्म घेतला माझ्या अंगणात आणि वृक्ष वल्लरी उमलायला लागल्या माझ्या अंगा-खांद्यावर तेव्हा किती आनंद झाला होता म्हणून सांगू. वेगवेगळ्या ऋतूत नवीन रूपं घेणारी फुलं, झाडं, वेली, रंगीबेरंगी फुलपाखरं, पशू, पक्षी, बंधमुक्त होऊन खळाळणारे झरे. सगळं सगळं किती मोहक होतं. जंगलात बागडणा-या पशू पक्ष्यांच्या चिवचिवाटातून निर्माण होणाऱ्या नादलहरी, नदी- सागराच्या पाण्याचे माझ्या अंगावर पडणारे तुषार किती सुखद अनुभूती देऊन जात होते मला. अगदी आनंदलहरीत न्हात होते मी क्षणोक्षणी.   प्रत्येकाची आपापली निसर्ग नियमानुसार ठरलेली दिनचर्या, कोणी कोणीच्या अध्यात ना मध्यात. प्रत्येक जीवाला स्वत:ची अशी एक लय होती. जो तो आपापल्या मार्गात रममाण. मानवाने जन्म घेतला आणि मी अधिक सुखाची स्वप्न पाहू लागले. सारासार विचार करण्याची देणगी मिळाली होती त्याला. वाटलं तो नंदनवन करेल आता या जगाचं. खूप छान दिवस येतील. सगळे कसे गुण्या गोविंदाने, एकोप्याने नांदतील आणि तो परमेश्वर धन्य होईल. एवढ्या विश्वाच्या पसाऱ्यात मानव जातीची देणगी निसर्गाने मलाच दिली म्हणून किती अभिमान वाटत होता मलाच माझा आणि तुमचा पण. 
पण कसचं काय? सुरवातीची काही शतकं छान गेली. त्यानंतर मात्र तुम्हा साऱ्यांची भूक खूप वाढायला लागली. विज्ञानाची कास धरत एकापाठोपाठ एक शोध लावत, सुखसोयी निर्माण करताना तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या हव्यास रूपी राक्षसही जन्म घेत होता हे तुमच्या लक्षातच आलं नाही: की लक्षात येऊनही दुर्लक्ष केलंत? हळू हळू या हव्यासानं स्पर्धेचं अक्राळविक्राळ रूप धारण केलं. तुम्हाला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला. प्रगतीच्या नावाने  माझ्या अंगा-खांद्यावर फुललेल्या या सुंदर सृष्टीला ओरबाडायला लागलात; स्वत:च्या स्वार्थासाठी. तुमच्याचसारखा जीव असणाऱ्या प्राण्यांना पण सोडलं नाहीत तुम्ही स्वत:च्या सुखासाठी. बिघडणारं ऋतूचक्र, त्सुनामी, जंगलात आग ओकणारे दावानल, कुठे अतिवृष्टि, कुठे अनावृष्टि, दरवर्षी येणारी वादळं, भूकंप अशा कितीतरी प्रकारांनी मी वेळोवेळी तुम्हाला धोक्याचे इशारे दिले. तुमच्या सतत वाढणाऱ्या आसुरी स्वप्नांचा वाढता भार मला पेलत नव्हता. विज्ञानाच्या सहाय्याने जणू संपूर्ण विश्वाचे संचालन आपल्या हातात आल्याच्या आविर्भावात बेताल झालात तुम्ही. थांबून माझ्या तक्रारींकडे पहायला वेळ नव्हता तुमच्याकडे. स्वत:ला हवं तसं वागवायला निसर्ग काही तुमच्या हातचं खेळणं नाही हे ही ध्यानात राहिलं नाही तुमच्या. निसर्गाचं संतुलन ढळलं तरीही तुमचा हव्यास संपलाच नाही. 
पाहिलंत त्याचा काय परिणाम झाला तो? एका कोरोना नावाच्या य:कश्चितविषाणूने हाहाकार माजवलाय तुमच्या विश्वात. तुमच्या गतीला, प्रगतीला पूर्ण खीळ घातली आहे. जागच्या जागी थांबवलं आहे साऱ्यांना. धोका मानव प्राण्यालाच आहे याचा सगळ्यात जास्त. तुम्हाला काय वाटतं रे असे सुमसाम, निर्मनुष्य रस्ते पाहून बरं वाटत असेल मला? शांत झाला असेल जीव माझा? घुसमटतो आहे रे माझा जीव. हे social isolation मला पण जीवघेणं होतंय रे. ते पशू पक्षी देखील किलबलाट करायचं विसरलेत तुमची अवस्था पाहून. तुमच्या अस्तित्वाने जीवंत झालेले हे रस्ते, चैतन्याने भारलेलं वातावरण मला पुन्हा अनुभवायचंय. समजताय नं माझ्या अंतरीची व्यथा. निसर्गाने खूप मोठी थप्पड दिली आहे तुम्हाला. शिकाल ना यातूनही काही? अजून वेळ गेलेली नाही. जाल ना पुन्हा त्या निसर्गाकडे? मानाल ना त्याचे आभार? कराल ना त्याच्या नियमांचे पालनहे सुमसाम काळेकभिन्न रस्ते आणि कोरोनामुळे होणारी तुमची अवस्था पाहवत नाहीये मला. वाट पहात आहे तुमची. लवकरच या पुन्हा पाहिल्यासारखे शहाणे- सुरते होऊन................

शब्दगंधा
२५.०३.२०२०

Comments

Post a Comment